बातो बातोमे

 

                                                             


                                                   शरद देशपांडे 

                                                                 ज्याचे त्याचे अध्यात्म

अध्यात्म ही बाजारात सहजपणे मिळणारी वस्तू नाही. संत चरित्राची पारायणे करून किंवा जदू कृष्णमूर्ति, दलाई लामा या सारख्यांची व्याख्याने एकूनही कोरडे पाषाण राहिलेले कांही कमी नाहीत. शिवाय ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, कबीराचे दोहे इत्यादि वाचून किंवा कृष्णमूर्ति आदींनी सांगितलेले अध्यात्म मी का म्हणून स्वीकारायचे हाही मूलभूत प्रश्न आहे. उसने अध्यात्म काय कामाचे?

अध्यात्म म्हणजे जीवनदृष्टी. ही ज्याची त्याने व मुख्यत: स्वत:साठी विकसित करायची असते. व्यक्ति  आपापली आयुष्ये विविध त-हांनी जगत असतात. जगण्याच्या जेवढ्या त-हा, तेवढ्या त-हांचे अध्यात्म. त्यामुळे सर्वांसाठी एकच अध्यात्म, सर्वांची एकच जीवनदृष्टी हा लोकशाहीला मानवणारा विचार नाही. या उलट सर्वांनी ज्ञानेश्वरीसारख्या एकाच गंथातल्या अध्यात्माची चर्चा करण्याऐवजी आपापल्या जीवन-दृष्टींची वा आपापल्या अध्यात्माची देवाण-घेवाण का करू नये? अशा डोळस देवाण-घेवाणीतूनच प्रत्येकाची जीवनदृष्टी किंवा प्रत्येकाचे अध्यात्म अधिक सकस होऊ शकते.

अध्यात्म जेवढे सकस तेवढी जीवन दृष्टीही अधिक व्यापक. सकस अध्यात्म किंवा व्यापक जीवनदृष्टी माणसाचे माणूसपण व त्याची प्रतिष्ठा जपणारी असते. सर्व संतांचे अध्यात्म एकच असले, तरी जो पर्यन्त मी ते माझ्या जीवनाच्या परिभाषेत मांडत नाही तोपर्यंत ते मला परके वाटणार. त्यामुळे माझे जीवन व माझ्या जीवनाची परिभाषा हाच माझ्या अध्यात्माचा आधार असला पाहिजे. आत्मप्रौढी आणि अंधश्रद्धा टाळून मी संतांच्या अध्यात्माला आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकलो पाहिजे. असा आत्मविश्वास असलेली व्यक्तीच अध्यात्म पचवू शकते. हा आत्मविश्वास ज्याच्या त्याच्या अध्यात्माची पहिली पायरी असली पाहिजे.

हल्ली अध्यात्माबद्दल अनेक तऱ्हांनी बोलले जाते. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते, किंवा विज्ञानाची परिणती शेवटी अध्यात्मातच होते असे म्हणण्याची जणू फॅशनच पडली आहे. काही वैज्ञानिकही याला अपवाद नाहीत. पण असे म्हणणाऱ्यांना विज्ञान नेमके कोठे संपते हे निश्चितपणे सांगता येत नाही. कारण विज्ञान ही एक सततची प्रक्रिया आहे. आध्यात्मिकांच्या गोटातही अध्यात्म हे विज्ञानाहून कसे श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न चालू असतो. मात्र त्यांनाही अध्यात्माचे श्रेष्ठत्व विज्ञानाच्या व आपल्या दैनंदिन जीवनातील सुख दु:खाच्या संदर्भातच सिद्ध करावे लागते.   

 विज्ञानाची परिणती अध्यात्मात होते म्हणजे नेमके काय होते, हे कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही. वैज्ञानिक संकल्पनांची व सिद्धान्तांची सत्यता प्रयोगाद्वारे कोणालाही पडताळून पाहता येते. पण अध्यात्मातील संकल्पनांची सत्यता अशा रीतीने पडताळून पाहता येत नाही. मग विज्ञानाची परिणती अध्यात्मात होते असे कसे म्हणता येईल? अध्यात्मा बद्दल आधीच जे गैरसमज आहेत ते वाढविण्याला काही वैज्ञानिकही जबाबदार आहेत.

अशा वैज्ञानिक आणी आध्यात्मिकांच्या फौजेत सामील होण्यापेक्षा मला एकांड्या, पण डोळस सॉक्रेटिसासारखे व्हायला, निदान तसा प्रयत्न तरी करायला, नक्कीच आवडेल.  



Comments